नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दि. २८/०५/२०२६ रोजी विशेष पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात आली.
अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पाहणी मोहिमेत कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), कार्यकारी अभियंता (मोरबे), संबंधित विभागीय उपअभियंते, सहाय्यक अभियंते, कनिष्ठ अभियंते तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वसमावेशक कंत्राटदार सहभागी होते.
भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्र, बेलापूर ते दिघा विभाग तसेच मुख्य जलवाहिन्यांवरील विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्यात आली. भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्र येथे ७२ पाणी नमुने, मुख्य जलवाहिनीवर ९६ पाणी नमुने तसेच बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभागात ४९५ इतके पाणी नमुने अशा प्रकारे एकूण ६६३ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
*या तपासणीमध्ये पिण्याच्या पाण्याचे pH, TDS, अवशिष्ट क्लोरीन (Residual Chlorine) व गढुळपणा (Turbidity) या घटकांची भारतीय मानक ब्युरो (BIS IS 10500) तसेच CPHEEO मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणी करण्यात आली.*
*तपासणीअंती पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही BIS व CPHEEO यांनी निर्धारित केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मानकांनुसार योग्य असल्याचे आढळून आले आहे.*
नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून पाणी गुणवत्तेबाबत नियमित तपासणी सातत्याने सुरू ठेवण्यात येत आहे.
त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांना सूचित करण्यात येते की, सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत आहे याची नोंद घ्यावी व याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा १८००२२२३०९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.













Leave a Reply