कोपरखैरणे विभागात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नगरसेवकांसह केली पाणी नमुने तपासणी

      मोरबे धरण, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, आग्रोळी येथील मुख्य जलकुंभ व पंपींग हाऊस यांची पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी पाण्यामध्ये पिण्यायोग्य गुणवत्ता आढळून आली. तरीही नवी मुंबईतील काही भागांतून नळाव्दारे काहीसे गढुळ पाणी येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने कोपरखैरणे नोडमध्ये तीन टाकी येथील मध्यवर्ती जलकुंभावर महापौर सौ. सुजाता पाटील यांनी स्थानिक नगरसेवकांसह पाहणी दौरा केला. त्यावेळी विविध सेक्टर मधून नागरिकांच्या घरातून घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी चाचणी करण्यात आली. 
     या तपासणी चाचणी दरम्यान त्यामध्ये पिण्यायोग्य पाण्यासाठी आवश्यक घटक योग्य प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले. शटडाऊननंतर सुरुवातीला ज्या प्रमाणात पाण्यात गढुळता होती ती कमी झाल्याचे आढळून येत आहे व तशा प्रकारच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. तसेच पाण्याची तपासणी चाचणी केल्यानंतर त्यामधील पीएच, टर्बिडिटी, टिडीएस व क्लोरिनचे प्रमाणही आयएसआय स्टँडर्डच्या मापदंडात असल्याचे दिसून येत आहे. तरीही सर्वच विभागांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या संख्येने पाणी नमुने तपासणी केली जात असून तपासणीनंतर पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण नागरिकांना दाखविले जात आहे व ते पाणी  पिण्यायोग्य असल्याचे विविध माध्यमातून सांगितले जात आहे. 
    
  याशिवाय नागरिकांना पाण्याविषयी तक्रारी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 1800222309 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून नागरिक त्यावर विनामूल्य संपर्क साधून आपली पाणी पुरवठयाविषयीची तक्रार नोंदवू शकतात असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केले आहे.  
      सध्या सर्वच विभागांमध्ये विविध ठिकाणांहून मोठया प्रमाणात पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. यासोबतच कोणत्याही नागरिकाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन पाणी नमुने घेतले जावेत व त्यांच्या तपासणी चाचण्यांचा अहवाल संबधित नागरिकाला दाखविण्यात यावा असे निर्देश महापौर महोदयांनी दिले. 
     
 काही वेळा जलवाहिन्या या गटारातून अथवा ड्रेनेज लाईन जवळून जात असल्याने त्यामध्ये लिकेज असल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते हे लक्षात घेऊन अशा ठिकाणी जलवाहिन्या तपासणी करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले. नागरिकांना पिण्यायोग्य पाणी देणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्या‍दृष्टीने प्रत्येकाने सतर्क राहून जबाबदारीने कार्यवाही करावी असेही निर्देश यावेळी देण्यात आले. 
    
  सदर पाणी नमुने तपासणी प्रसंगी महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या समवेत इ प्रभाग समिती सभापती श्रीम. चंद्रभागा मोरे, पाणी पुरवठा समितीचे सभापती श्री. रविकांत पाटील, विधी समितीच्या सभापती ॲड. सायली शिंदे, नगरसेवक श्री. शिवराम पाटील, श्रीम. अनिता पाटील, ॲड. भारती पाटील, श्री. संदिप म्हात्रे, श्री. शिरीष पाटील, श्रीम. वैष्णवी नाईक, श्री. रॉबिन मढवी, श्रीम. मिनाक्षी पाटील, श्रीम. दिक्षा कचरे तसेच अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे आणि कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. संतोष उनवणे व कोपरखैरणे  विभागाचे सहा.आयुक्त श्री. भरत धांडे आणि इतर अधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.  

सध्या वातावरणातील उष्मा मोठया प्रमाणात वाढला असून उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवतो आहे. त्यामुळे मळमळ, उलटी, जुलाब अशा आरोग्याच्या समस्याही होत आहेत. तरी नागरिकांनी महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, जास्त प्रमाणात पाणी प्यावे असे आवाहन करतांनाच मोरबे धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा असून पाऊस कधी येईल हे ठाऊक नसल्याने असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करुन ते पुरविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे लक्षात घेत पाण्याचा योग्य वापर करावा व दुरुपयोग टाळावा असेही आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *