जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लीव्हज् अ मार्क’ अभिनव लक्षवेधी उपक्रम

  • 2400 हून अधिक नागरिकांचा सहभाग; 40 किलो प्लास्टिक संकलनातून मॅंग्रोव्ह संवर्धनाला हातभार

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून प्लास्टिकमुक्त नवी मुंबई संकल्पनेसाठी काम करणाऱ्या प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या व माईंडस्पेस रिटल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली येथील माईंडस्पेस बिझनेस पार्कमध्ये ‘लीव्हज् अ मार्क’ हा जनजागृतीपर अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या अंतर्गत नवी मुंबईतील खारफुटी (मॅंग्रोव्ह) परिसंस्थेचे महत्त्व आणि प्लास्टिक प्रदूषणामुळे होणाऱ्या घातक परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.

‘नवी मुंबई प्लास्टिक आणि ई-वेस्ट रिसायक्लोथॉन’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘लीव्हज् अ मार्क’ या उपक्रमात 2400 हून अधिक नागरिक, कर्मचारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. एका 32 फूट x 48 फूट आकाराच्या भव्य कॅनव्हासवर नागरिकांच्या पाऊलखुणांद्वारे मॅंग्रोव्ह परिसंस्थेचे चित्र साकारण्यात आले. हिरव्या आणि निळ्या रंगांच्या मानवी पाऊलखुणांनी मॅंग्रोव्हची झाडे व जलमार्गांचे प्रतिकात्मक लक्षवेधी चित्रण करण्यात आले.

या मोहिमेमध्ये 2,400 हून अधिक प्लास्टिकच्या बाटल्या आणि कंटेनर यांचे संकलन करण्यात आले. त्याचप्रमाणे साधारणत: 40 किलो प्लास्टिक कचरा पुनर्वापरासाठी वळविण्यात आला. उपलब्ध वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे या प्रयत्नामुळे ठाणे खाडी परिसरातील अंदाजे 280 मॅंग्रोव्ह वृक्षांवरील प्लास्टिकचा संभाव्य ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

संकलित प्लास्टिक हे प्रोजेक्ट मुंबई संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले असून त्यापासून महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी बाके तयार करण्यात येत आहेत. या उपक्रमात पर्यावरणपूरक आणि पुनर्वापरित साहित्याचाही वापर करण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या उपक्रमाची प्रशंसा करीत नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून हा उपक्रम राबविला गेला असल्याने त्यामध्ये नागरिकांच्या पर्यावरण जागरुकतेचे प्रतिबिंब पडले असल्याचे सांगितले. नागरिक, प्रशासन आणि उद्योग क्षेत्र यांच्या एकत्रित सहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

माईंडस्पेस REIT चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक रमेश नायर यांनी भौतिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधण्याच्या संस्थेच्या बांधिलकीवर भर दिला.

प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक विश्वस्त शिशिर जोशी यांनी प्लास्टिक व्यवस्थापन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत, या उपक्रमामुळे मॅंग्रोव्ह संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती झाल्याचे नमूद केले.

आगामी काळात मॅंग्रोव्ह स्वच्छता मोहीम, पुनर्वापरित प्लास्टिकपासून सामुदायिक बाग उभारणी तसेच शाळा, महाविद्यालये आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये पर्यावरणविषयक विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *