13 ते 15 मे या कालावधीत शटडाऊन घेतल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर सर्वच विभागांतून पाणी गढुळ असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ लागल्यानंतर नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर श्री.दशरथ भगत यांच्यासह मोरबे धरणापासून भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, मुख्य जलकुंभ, स्काडा प्रणाली अशा सर्व पाणीपुरवठा व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. पाणीपुरवठा विभागास आदेश देऊन सर्व विभागात मोठ्या संख्येने जलनमुने तपासणी करण्यात आले. त्यानंतर कोपरखैरणे विभागापासून सुरूवात करीत स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रत्येक विभागात जाऊन तेथील पाणी गुणवत्ता तपासणीची पाहणी करण्यास सुरूवात केली.
या अनुषंगाने आज महापौर महोदयांनी उपमहापौर व विभागातील नगरसेवकांसह सेक्टर 9 येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवनामध्ये नेरूळ विभागातील पाणी नमुने तपासणीची पाहणी केली. यावेळी उपमहापौर श्री. दशरथ भगत, ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. रूपाली भगत, क्रीडा समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे, नगरसेवक श्री.प्रदीप गवस, श्री.सुरेश शेट्टी, श्रीम.माधुरी सुतार, श्रीम.मीरा पाटील, श्रीम. स्वप्ना गावडे, श्रीम.प्रिती भोपी, डॉ.प्रणाली पाटील तसेच अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. संतोष उनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते.
शटडाऊननंतर सुरूवातीच्या काळात गढुळ आलेल्या पाण्याचा रंग दिवसागणिक फिकट होत आता पूर्ववत झालेला असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. तरीही काही तक्रार असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या 1800222309 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापौर महोदयांनी केले.
मागील काही दिवसात पाण्याच्या रंगबदलाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊनही पाणी पुरवठा विभागाने नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या घरातील पाणी नमुने तपासून ते पिण्यायोग्य असल्याचे त्यांना दाखवून आश्वस्त करण्याचे काम केले त्याबद्दल महापौर महोदयांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या तत्परतेची प्रशंसा केली.
सध्या हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जलस्त्रोतातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी पातळी आता 71 मीटरवर आलेली असून वापरण्यायोग्य 15.24 टक्के जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवठा करता येईल अशी माहिती महापौर महोदयांनी दिली. त्यातही पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही आणि यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊसही नेहमीपेक्षा कमी पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे असलेल्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी आपल्या आसपासच्या शहरांमधील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा अनावश्यक वापर व अपव्यय टाळावा असे आवाहन महापौर महोदयांनी केले.
यावेळी नगरसेवकांनी जुन्या झालेल्या पाईप लाईनला छिद्रे पडल्याने काही ठिकाणी त्या गटारातून गेलेल्या असल्यास त्यात दूषित पाणी शिरते, त्यामुळे जलवाहिन्या नव्या टाकाव्यात अशी मागणी केली. विशेषत्वाने गावठाण भागात तसेच एलआयजी आणि झोपडपट्टी भागात हा प्रश्न उद्भवतो असेही निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबत महापौर महोदयांनी रस्ते व गटारांची नवीन कामे करताना गटाराच्या बाजूला पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठी लहान आकाराचा स्वतंत्र डक्ट बनवावा अशी सूचना केली, जेणेकरून पाण्याच्या पाईपलाईन स्वतंत्र राहतील.
पाण्याची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागांमधील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यासाठी मोहीम हाती घेतल्याची माहिती देत शास्त्रोक्त तपासणीअंती पाणी पिण्यायोग्य असल्याचे सर्व ठिकाणी निदर्शनास आले असून आता पाण्याचा रंगही पूर्ववत दिसू लागलेला आहे. तरीही जलनमुने तपासण्या अशाच सुरू राहणार असल्याचे सांगत नागरिकांनी मोरबे धरणातील जलसाठ्याचा विचार करून व इतर शहरांमधील पाण्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन असलेल्या पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केले आहे.












Leave a Reply