नवी मुंबईच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुशिक्षित, अनुभवी आणि जनसामान्यांची नाडी ओळखणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीकडे पाहता, महापौरपदासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण, प्रशासकीय समज आणि निर्णयक्षमता या सर्व बाबी त्यांच्याकडे आहेत का ? त्यावर टाकूया एक नजर …
सुजाता पाटील या उच्चशिक्षित असून त्यांनी एम.कॉम. (M.Com) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या प्रभाग क्रमांक २३ (अ) मधून भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. यापूर्वी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून त्यांनी प्रभावी व परिणामकारक कार्यकाळ भूषवत प्रशासकीय जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळण्याची क्षमता सिद्ध केली आहे.
महापौरपद हे केवळ सन्मानाचे नसून प्रशासकीय समन्वय साधणे, सभागृहाचे कामकाज प्रभावीपणे चालवणे तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील दुवा सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेले पद आहे. या दृष्टीने सुजाता पाटील यांचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सभागृहातील नियम, विविध समित्यांचे कार्य, विकासकामांचा पाठपुरावा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्वरित व योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी आपल्या कारकिर्दीत वेळोवेळी दाखवून दिली आहे. संयमी स्वभावासोबतच प्रसंगी ठाम आणि आक्रमक भूमिका घेण्याची त्यांची तयारी महापौरपदासाठी आवश्यक असलेल्या नेतृत्वाला बळ देणारी आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य योजना तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवत आपल्या संवेदनशील आणि कार्यक्षम भूमिकेची प्रचिती दिली आहे. निर्णय प्रक्रियेत माणुसकी आणि प्रशासनात शिस्त यांचा समतोल साधण्याचे गुण त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे समोर आले आहेत.
सुजाता पाटील यांच्या सक्षमतेचा सर्वात ठळक पुरावा म्हणजे त्यांनी जनहितासाठी पुकारलेले संघर्ष. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या पाणीवापराच्या मर्यादेच्या निर्णयाविरोधात त्यांनी सभागृहात घेतलेली ठाम भूमिका मैलाचा दगड ठरली. या लढ्यामुळे प्रशासनाला अखेर तो निर्णय मागे घ्यावा लागला. पाण्यासाठी काढलेला हंडा मोर्चा असो किंवा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीची आंदोलने—सुजाता पाटील यांनी नेहमीच रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांचे नेतृत्व केले आहे.
प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण, लोकप्रतिनिधी म्हणूनचा समृद्ध अनुभव आणि तळागाळातील नागरिकांशी असलेला थेट संवाद ही सुजाता पाटील यांच्या कार्याची प्रमुख बलस्थाने आहेत. त्यामुळे एक सुशिक्षित, अभ्यासू आणि प्रसंगी कठोर व निर्णायक भूमिका घेण्याची क्षमता असलेली महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कामगिरी नवी मुंबईच्या महापौरपदासाठी ठळक व भक्कम मानली जात आहे.
















Leave a Reply