ऐरोलीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सराव प्रश्नसंच व मार्गदर्शन शिबिर; ‘टाकाऊतून टिकाऊ’ बेंचेसचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील यांच्या विशेष उपस्थितीत ऐरोली सेक्टर १४ येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १०३ मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत सराव प्रश्नसंच वाटप’ व ‘तज्ज्ञ व्याख्याते मार्गदर्शन शिबिर’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. बोर्ड परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि परीक्षेचे स्वरूप समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या वेळी अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून व सौजन्याने तयार करण्यात आलेला मोफत सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला. परीक्षेचा ताण कसा हाताळावा, अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे आणि यश कसे संपादन करावे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेचे प्रत्यक्ष दर्शन. शाळेत संकलित करण्यात आलेल्या टाकाऊ प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बेंचेसचे उद्घाटन अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *