नवी मुंबई- केंद्र सरकार देशातील पाच विमानतळाच्या नामकरणाबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. त्यात राज्य सरकारने एकमताने मंजूर करून केंद्र सरकार कडे पाठविलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव देखील आहे, त्यामुळे विमानतळाचे दि. बा पाटील असेच नामकरण होईल याबाबत मनांत कोणतीही शंका नाही असे माजी खासदार डॉ संजीव नाईक यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व: दि. बा. पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिना निमित्ताने नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री भेट या सामाजिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ संजीव नाईक उपस्थित होते.
यावेळी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत, वैजयंती दशरथ भगत, युवा नेतृत्व निशांत भगत, समाजसेवक संदीप भगत, संजय यादव, देवेंद्र खाडे, विठ्ठलराव यादव, शैलेश घाग, सचिन शिंदे, मनोज महाराणा, बृहन्मुंबई व मुंबई तसेच उरण विभागातील मच्छिमार बांधवांचे नेतृत्व करणारे भुवनेश्व धनु, विजय वरळीकर, चंद्रकांत कोळी, राकेश कोळी, प्रमोद कोळी, जयेश आक्रे,अजिंक्य पाटील, संदेश भोटेकर हे देखिल उपस्थित होते.
लोकनेते दि . बा. पाटील हे थोर नेतृत्व होते त्यांनी ठाणे, रायगड आणि मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना सन्मान व त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिले आहेत. विरोधी पक्षात असून देखिल त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सभागृहात नामोहरण त्यांनी केले होते. मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी कायद्यात बदल करून, सर्वांना मदत मिळेल यासाठी वनमंत्री गणेश नाईक हे स्वतः याकामी जातीने लक्ष घालत आहेत. अटल सेतू मुळे मच्छीमारांचे होणारे नुकसान भरपाई ही एमएमआरडीए, वाशी खाडी पूल बाधितांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ किंवा एमएमआरडीए यापैकी एक आणि होत असलेल्या घणसोली – ऐरोली पामबीच मार्गामुळे बाधितांना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे डॉ संजीव नाईक यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात १४ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत. त्यापैकी ३ हजार तरुणांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात आहे. तसेच भविष्यात ५५ हजारापेशा जास्त रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या ७ महाविद्यालयांमध्ये एआय चे शिक्षण सुरू करण्यात आले. तसेच इम्पोर्ट एक्स्पोर्ट (आयात निर्यात) क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. सीबीडी येथे लॉजिस्टिक क्षेत्र कार्यरत व्हायला सुरुवात झाली आहे, नवी मुंबईत विविध इंटरनॅशनल व नॅशनल कपन्यांकडून सुमारे ५५० लाख कोटी रुपयांची डेटा सेटर मध्ये गुंतवणूक केली जाणार असल्याने डेटा सेंटर्स मध्ये देखिल नोकरी उपलब्ध होणार आहेत, त्यादृष्टीने तरुणांनी शिक्षण घेतले पाहिजे असे सांगत शहरातील धोकादायक इमारतीचे सेल्फ पुनर्विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ संजीव नाईक यांनी सांगितले.
दि. बा. पाटील साहेब यांचे सर्व आयुष्य हे लोकांसाठी आणि समाजासाठी समर्पित होते. त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन परतावा कायद्याच्या माध्यमातून साडेबारा टक्के योजनेतून भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाले आहेत. प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात मात्र शहरातील नागरिकांसाठी देखील त्यांच्या शहरातील नव्याने निर्माण झालेल्या गरजांसाठी आंदोलन करणे आवश्यक आहे, त्यासाठी सिडकोची सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे आणि पंतप्रधान आवास योजना या योजनेतील पन्नास टक्के घरे ही स्थानिकांसाठी राखीव ठेवली पाहिजे असे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले. साडेबारा टक्के योजनेतून मिळालेल्या भूखंडावर ज्या इमारती उभारण्यात आल्या आहेत इमारतीत सर्व सामान्य नागरिक राहत आहेत. राज्यात स्वतःच्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही एकमेव आहे ना. गणेश नाईकसाहेब यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले परतू, नवी मुंबईकराचे हक्काचे पाणी पळवले जात आहे. शहराच्या विकासाठी येथील नागरिकांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी त्यांच्या समस्या सोडवणे आपले कर्तव्य असल्याचे दशरथ भगत म्हणाले.
एकविसाव्या शतकात दि बा पाटील यांच्या सारखे आयुष्य कोणी जगू शकत नाही. समाजाच्या कल्याणासाठी त्यांना आपले आयुष्य दिले आपल्या काय मिळेल यापेक्षा समाजाला काय मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याच्याच स्मरणार्थ त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने गुणवंत विद्यार्थीचा गुणगौरव आणि ज्येष्ठांना छत्र्या भेट हा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला असल्याचे युवा नेते निशांत भगत यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांची सुरक्षा स्वच्छता, शांतता ठेवणे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. प्रभागातील नागरिक हे आपला परिवार आहेत म्हणून प्रभागात यापुढेही प्रभागातील नागरिकांच्या जीवनातील, वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे निशांत भगत म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, महाविद्यालयीन बॅग्स भेट देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच जेष्ठ नागरिकांना छत्र्या देखील भेट देण्यात आल्या.














Leave a Reply