नवी मुंबईतील सारसोळे पामबीचजवळील होल्डिंग पाँड (धारण तलाव) क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुधारणेबाबतची महत्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबई मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिका, सिडको आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध विभागांतील समन्वय वाढवून प्रलंबित कामांना गती देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.
बैठकीदरम्यान सारसोळे ग्रामस्थांनी मागील दोन वर्षांपासून रस्ता सुधारणा काम रखडल्याची समस्या मांडली. त्यांनी सांगितले की, सारसोळे गावाचे श्रद्धास्थान असलेले श्री. बामणदेव हे धारण तलावालगत स्थित आहे. या ठिकाणी जाणारा जुना कच्चा रस्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदारालाही कार्यादेश दिला गेला आहे. तरीही वनविभागाच्या परवानग्या आणि शासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे काम सुरूच होऊ शकले नाही.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित विभागांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आणि प्रलंबित काम त्वरीत सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच संबंधित विभागांनी समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
याच बैठकीत ग्रामस्थांनी जेटी परिसरात मच्छिमारांना होणाऱ्या अडचणींचाही मुद्दा मांडला. मच्छिमार बांधवांना सहजपणे ये-जा करता यावी यासाठी आवश्यक असलेली पायवाट सुधारण्यासाठी वनविभागाने त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. वनमंत्री नाईक यांनीही या बाबतीत वनविभागाला आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस माजी नगरसेवक सुरज पाटील, तसेच सारसोळे गावातील यशवंत तांडेल, कृष्णा तांडेल, अमोल मेहर, देवनाथ मढवी, मोहन पाटील, पद्माकर मेहर आदी मान्यवर उपस्थित होते.












Leave a Reply