नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरुळ सेक्टर 1 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. गणेशजी नाईक यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या सोहळ्याला आमदार मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अनावरणापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विधीवत पूजन रायगडावर पूजा करणारे पुजारी कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर लोहार आणि अनंत केरेमणी यांच्या हस्ते पार पडले. संपूर्ण परिसर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी–जय शिवाजी’च्या घोषणांनी निनादत होता आणि चौकात जमा झालेल्या शिवभक्तांच्या जयघोषामुळे वातावरण शिवमय झाले होते.
राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील हा चौक नेहमीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जातो. येथे शिवरायांचा पुतळा बसवावा, अशी मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत होती. या मागणीनुसार घुमटाकार मेघडंबरीखाली ब्रॉन्झ धातूचा सिंहासनारूढ पुतळा प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. 12 फूट उंचीचा आणि 2.5 टन वजनाचा हा भव्य पुतळा शिल्पसृष्टी कला प्रतिष्ठानचे प्रमुख शिल्पकार प्राध्यापक मोरेश्वर पवार यांनी निर्मित केला आहे. पुतळ्याभोवती ऐतिहासिक वातावरण निर्माण करण्यासाठी चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले असून, परिसरात भाला धरलेले मावळे आणि तोफांसह उभारलेल्या शिल्पाकृतींमुळे संपूर्ण चौक ऐतिहासिक कलाकृतीसारखा भासतो.
नवी मुंबई महानगरपालिका शहराच्या सौंदर्यीकरणात आणि वारसा जपण्यात सातत्याने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. त्याच दूरदृष्टीचा भाग म्हणून नेरुळमधील हा चौक आता केवळ वाहतुकीचा केंद्रबिंदू न राहता, नव्या स्वरूपात एक आकर्षक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून उदयास आला आहे.












Leave a Reply