मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील लाखो मराठा बांधवांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी स्थानिकांनी उत्स्फूर्तपणे मोठे सहकार्य केले होते. या अभूतपूर्व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी,सकल मराठा समाज नवी मुंबई व लोकशक्ती फाउंडेशनच्या वतीने मराठा आरक्षणाचे जनक आणि माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै .अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबईत ” “ सन्मान कर्तुत्वाचा – सन्मान दातृत्वाचा “ एक कृतज्ञता सोहळा ” आयोजित करण्यात आला होता.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित या कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून आंदोलनात सक्रिय मदत करणाऱ्या बांधवांच्या एकजुटीच्या भावनेला आणि सामाजिक ऋणाला ‘कृतज्ञता सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले तर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’ करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कैलासवासी अण्णासाहेब पाटील जीवनगौरव पुरस्काराची सुरुवात. या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरलेले मराठा समाज नवी मुंबई संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय कदम यांना यावर्षीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कृतज्ञता सोहळ्याचे आणखी एक मोठे आणि समाजहिताचे पाऊल म्हणजे नवी मुंबईकरांसाठी ॲम्बुलन्सचे लोकार्पण. सकल मराठा समाजाच्या वतीने, सीसीसी ग्रुप आणि लोकशक्ती फाउंडेशनच्या सहकार्याने ही ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जी संपूर्ण नवी मुंबईतील गरजूंना त्वरित वैद्यकीय सेवा पुरवणार आहे.
तसेच यावेळी महिलांसाठी लकी ड्रा काढून विजेत्या महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
अशा प्रकारे, हा कृतज्ञता सोहळा सन्मान, समर्पण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम ठरला.
याप्रसंगी माथाडी कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदे, मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे , स्वर्गीय आणणसहेब पाटील ह्यांचे चिरंजीव डॉ हनुमंतराव पाटील , व्यावसायिक प्रकाश बाविस्कर , युवा नेते वैभव नाईक, माजी नगरसेवक सुरज पाटील , माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे , शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे , सीसीसी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर नियामत आझाद, शिवसेना उबाठा गटाचे उपनेते विठ्ठल मोरे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष, भावना घाणेकर, , माजी नगरसेवक राजू शिंदे, वृत्त निवेदिका वृषाली यादव , समाजसेविका डॉ जयश्री पाटील , डॉक्टर कांचन वडगावकर पाटील शिवराज्य ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधवराव , शिवसेना नेत्या अयोध्या पोळ , इतिहास संशोधक अमर साळुंखे , उद्योजक महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी सकल मराठा समाज नवी मुंबईचे मुख्य समन्वयक विनोद पोखरकर यांनी या कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.












Leave a Reply