नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सानपाडा या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले अनेक वर्षांपासून या इमारतीची प्रतीक्षा केली जात होती. जीर्ण आणि कोंदट अशा तीन खोल्यातून सानपाडा विभागाचा कायदा सुव्यवस्थेचा गाडा हाकण्यात येत होता मात्र आता नवीन वास्तू मधून कामकाज पहिले जाणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या सानपाडा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडले. तसेच सक्षमतेकडे एक पाऊल पुढे टाकत नवी मुंबई पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचाही शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्यादरम्यान पार पडला।
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, आयुक्त मिलिंद भारंबे सह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी सानपाडा पोलीस ठाणे नवीन इमारत उद्घाटनानंतर वाशी, पनवेल आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वाटप केले गेले. या शिवाय ई-संवाद ऑनलाईन सेवा, सायबर / आर्थिक गुन्हे कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी करून घेतली.
सुसज्ज पोलीस ठाणे
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असणाऱ्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्याचा मोठा भाग सानपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येतो. सानपाडा पामबीच येथील मोराज सर्कलसमोर सानपाडा पोलीस ठाणे सुमारे १८ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर साकारले आहे. या ठाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे नवी मुंबईतील पहिले सौरऊर्जेवर चालणारे पोलीस ठाणे येत्या काळात ठरणार आहे. याचे बहुतांश काम पूर्णत्वास येत आहे. चार मजली या इमारतीत ४० हून अधिक खोल्या असून सुरक्षिततेसाठी खास लॉकरसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र हौसिंग कार्पोरेशनने बांधलेली सानपाडा पोलीस ठाण्याची नवीन इमारत राज्यातील सर्वात सुसज्ज आणि अद्ययावत पोलीस ठाण्यांपैकी एक असणार आहे. येथे पोलिसांना लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, तसेच सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये काही पोलीस ठाण्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ISO मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ई-संवाद ऑनलाईन सेवा आणि सायबर/आर्थिक गुन्हे (Cy-Fi) तपास कक्षाची औपचारिकपणे सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि अद्ययावत पोलीस सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
स्वागत कक्ष, कर्मचारी विश्रांती गृह, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष, लॉकअप रूम, सुसज्ज पार्किंग, कोठडी, बैठक शिवाय सायबर आर्थिक गुन्हे विभाग तसेच सर्व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असून तक्रारदार आणि भेट घेणाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार कुमार आयलानी, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी , नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.












Leave a Reply