नवी मुंबई येथील कांदा-बटाटा मार्केट येथे माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘माथाडी कामगारांचा भव्य मेळावा व गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा’ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ गुणवंत माथाडी कामगारांना ‘माथाडी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या मेळाव्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकुर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी नेते नरेंद्र पाटील, माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे, माजी नगरसेवक, बाजार समितीचे पदाधिकारी तसेच व्यापारी प्रतिनिधी व माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात बोलताना संघटनेचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि संघटनेचे कार्याध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथाडी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न, बाजार समितीतील किरकोळ व्यापार, तसेच वडाळा गृहनिर्माण प्रकल्पाबाबत लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी विनंती केली.
त्यावर आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या घरांचा प्रश्न, नाशिक व सातारा येथील माथाडी कामगारांचे तसेच पुणे येथील माथाडी कामगारांचे प्रश्न यावर येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे अभिवचन दिले.
दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या महामंडळाच्या कारकीर्दीत महामंडळाच्या माध्यमातून पाच लाख उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय व्यक्त केले.












Leave a Reply