नवी मुंबईत जनता दरबारामध्ये २८० पेक्षा अधिक निवेदने प्राप्त; ७०% निवेदानांचा जागीच निपटारा

…तोपर्यंत जनता दरबार सुरूच राहील – वनमंत्री गणेश नाईक

जोपर्यंत जनता आपल्या समस्या घेऊन येते आहे तोपर्यंत जनता दरबार सुरूच राहील, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी केले आहे.

मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात  जनता दरबार पार पडला. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी विविध विषयांवरील 280  पेक्षा अधिक निवेदने सादर केली. यापैकी 70% निवेदनांवर उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देत कार्यवाही करण्यात आली. उर्वरित निवेदनांवर समयबद्धरीत्या कार्यवाही करण्यात येणार आहे.

नागरी समस्या, प्रशासनाकडून झालेला अन्याय, विविध घटकांच्या प्रलंबित मागण्या, नागरी समस्या इत्यादी    विषयीची निवेदने नागरिकांनी सादर केली. नवी मुंबई सह ठाणे, रत्नागिरी, पालघर, बीड अशा अन्य जिल्ह्यातून नागरिक निवेदने घेऊन आले होते. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, खासदार हेमंत सवरा, नवी मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी, सिडको, एमआयडीसी,  सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महानगर गॅस, पोलीस, वने इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून राज्याचा कोणताही मंत्री कोठेही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार घेऊ शकतो, असे नमूद करून जोपर्यंत जनतेच्या समस्या आहेत तोपर्यंत जनता दरबार सुरूच राहील, असे ते म्हणाले. जनतेच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम जनता दरबाराच्या माध्यमातून होत असते.

एमआयडीसीमधील राहिवाश्यांना एमआयडीसी अधिकाऱ्यांनी नोटिसा धाडल्या. हे रहिवासी निवेदन घेऊन जनता दरबारात आले होते. या संदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्याना फोन करून सरकारने कायद्याने अभय दिलेल्या घरांना नोटिसा देऊन नागरिकांमध्ये घबराट निर्माण करू नका असे निर्देश वनमंत्री नाईक यांनी दिले.  

नवी मुंबई होकर्स अँड वर्कर्स युनियनने सानपाडा मार्केट येथील फेरिवाल्यांना न्याय देण्यासाठी निवेदन दिले. यावर कोर्टाच्या आदेशानुसार या फेरिवाल्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्याची सूचना त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याना केली. कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य योजनांचा  नगरपालिका प्रशासन संचालनाल याने दिलेल्या आदेशाप्रमाणे लाभ मिळावा यासाठी म्युनसिपल एम्प्लॉईज यूनियनने निवेदन दिले. त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना मंत्री नाईक यांनी यावेळी प्रशासनाला केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *