रायगड: कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यांच्या प्रवासात रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज रायगड जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यात केले.
मंत्री भोसले यांनी पळस्पे ते कशेडी बोगदा या मार्गावरील सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविंद्र पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य अभियंता एम.एन. राजभोज, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदी अधिकारी उपस्थित होते.
महाड येथे झालेल्या आढावा बैठकीत मंत्री भोसले म्हणाले की, “मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. प्रवासादरम्यान नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कामे दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे.”
इंदापूर व माणगाव बायपास पुलांसाठी नवीन ठेकेदारांची नियुक्ती झाली असून हे काम किमान एक वर्षात पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खोपोली-पाली मार्ग सुस्थितीत ठेवणे, इंदापूर व माणगाव येथे पोलिस बंदोबस्त वाढवणे, तसेच होमगार्डची मदत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सोयीसाठी महामार्गावर सुविधा केंद्र उभारण्यात यावीत. तसेच जिथे पुलांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी सर्विस रोडवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत, त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही मंत्री भोसले यांनी यावेळी दिली.











Leave a Reply