पालघर : राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आदिवासी बहुल जव्हार तालुक्यात जनता दरबार भरवून थेट नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
या जनता दरबारात रस्ते, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण व्यवस्था, शाळांची पडझड, आरोग्य सेवा, जमीन अधिग्रहण व मोबदला अशा विविध प्रश्नांवर नागरिकांनी आपली व्यथा मांडली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या ठिकाणी निवेदने सादर केली.
पालकमंत्री नाईक यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच काही गुंतागुंतीच्या प्रकरणांवर निर्धारित मुदतीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अनेक तक्रारींवर त्यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यास सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असून शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल. तसेच ग्रामविकास, वनहक्क, जमीन मोबदला, टॉवर व गॅस पाईपलाईन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करता आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा उपलब्ध ठेवणे, शाळांमध्ये सुरक्षिततेची काळजी घेणे आणि जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
या जनता दरबारात आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्यासह महसूल, वन, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे अनेक प्रश्नांना जागेवरच तोडगा निघाला.











Leave a Reply