आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी, मतदान केंद्रे, आवश्यक मनुष्यबळ, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) यांची तयारी वेळेत पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज नाशिकमध्ये दिल्या.
नाशिक विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
मतदार यादी आणि मतदान केंद्रांबाबत स्पष्टता
आगामी निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची सुधारित विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार असून त्यास भारत निवडणूक आयोगाची मान्यता लवकरच मिळणार आहे. वाघमारे यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही.
बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्या जात असल्यामुळे विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक मतदान केंद्रांची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार संभाव्य मतदान केंद्रांची योजना करताना दिव्यांग आणि सर्वसामान्य मतदारांसाठी सुविधा असणाऱ्या इमारतींची निवड करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
EVM आणि मनुष्यबळाचे नियोजन
प्रत्येक जिल्ह्याने उपलब्ध मतदान यंत्रांचा तपशीलवार आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार नव्या यंत्रांची मागणी करावी, असे निर्देश देण्यात आले. या संदर्भात मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करून पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करून ती वेळेवर सज्ज ठेवण्याचे आवाहन केले. तसेच मतदान केंद्रांच्या इमारतींची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मनुष्यबळाबाबतची तयारी आतापासूनच सुरू ठेवण्यावर भर दिला.
विभागीय आणि जिल्हास्तरीय सादरीकरण
बैठकीच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक विभागातील निवडणूक पूर्व तयारीसंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, सध्याची संभाव्य लोकसंख्या, मतदान केंद्रांची संख्या आणि सुविधा यांचा तुलनात्मक आढावा दिला.
पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनीही आपापल्या कार्यक्षेत्रातील निवडणूक तयारीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली.
रिपोर्ट: नवी मुंबई नेटवर्क ब्यूरो
दिनांक: 6 अगस्त 2025











Leave a Reply