नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत कार्यान्वित घणसोली येथील बेघर निवारा केंद्र निराधारांचा आसरा म्हणून ओळखले जाते. या केंद्रास आज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार चित्रा वाघ यांनी भेट देत तेथील कामकाजाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नमुंमपा समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे व कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे उपस्थित होते.
या भेटी दरम्यान आ. चित्रा वाघ यांनी बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या लाभार्थी महिलांसोबत संवाद साधून बेघर निवारा केंद्रात मिळत असलेल्या सोयी सुविधांबाबत विचारणा केली. यावेळी त्या महिलांनी सकाळी नाश्ता, दुपारी व रात्री जेवण तसेच आरोग्याची तपासणी व औषधोपचार वेळच्या वेळी केला जातो असे अभिप्राय दिले. या महिलांसोबत चर्चा करताना आ.चित्रा वाघ यांनी या महिलांची पार्श्वभूमी जाणून घेतली तसेच बेघर निवारा केंद्रात येण्याची कारणे समजून घेतली.
यावेळी त्यांनी बेघर निवारा केंद्रातील इतर व्यवस्थांचीही पाहणी केली. याठिकाणी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक तैनात असतात तसेच येथील सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थितरित्या कार्यरत असल्याने याठिकाणी महिला सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली. इतर सदस्यांसह लवकरच बेघर निवारा केंद्रास भेट देणार असल्याचे सांगून त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेघर निवारा केंद्र उत्तम प्रकारे सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 15 मार्च 2024 पासून घणसोली सेक्टर 4 येथे स्वतंत्र इमारतीत हे बेघर निवारा केंद्र सुरु असून याठिकाणी सद्यस्थितीत 48 महिला, 48 पुरुष व 2 बालके असे एकूण 98 बेघर या बेघर निवारा केंद्रात रहात असल्याचे समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे यांनी सांगितले.












Leave a Reply