नवी मुंबईतील विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अन्यायकारक धोरणा विरोधात ‘घरे वाचवा, घरे वाचवा’ या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले .
नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना वाढीव बांधकाम प्रकरणी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिसांविरोधात हे आंदोलन करण्यात आले. वाढीव बांधकामाच्या नोटिसांमुळे अनेक कुटुंबांना कायदेशीर आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ह्याच मुद्द्यावरून आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या मोर्च्यामध्ये नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, वाढीव बांधकाम प्रकरणी बजावलेल्या नोटिसा बजावून सिडको आणि महानगरपालिकेने सुरु केलेली नागरिकांवर अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली . आता सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












Leave a Reply