मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. कुटुंबासोबत मुंबईबाहेर गेलेले राज ठाकरे आज कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. योगायोगाने, त्यांचे पुतणे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही आज ३५ वा वाढदिवस आहे. या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांना दुजोरा देत, अनेक ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकाच बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो छापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही वाढती जवळीक राजकीय निरीक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे.
- फडणवीसांच्या शुभेच्छा आणि अचानक भेट
या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि राजकीय चर्चांदरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना दिलेल्या मोजक्या शब्दांतील शुभेच्छाही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. फडणवीस यांनी सकाळी पावणेअकरा वाजता आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन राज ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे एक खास शुभेच्छापत्र पोस्ट केले. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.
मात्र, वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार की युती फिस्कटणार अशा चर्चांना त्यावेळी जोर धरला होता. आता फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे या चर्चांना वेगळे वळण लागले आहे.
- मनसेच्या रक्तदान शिबिरात ठाकरे गटाची उपस्थिती
मुंबईत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे आणि ठाकरे गटाची वाढती जवळीक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. या रक्तदान शिबिरात मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये वाढलेली ही जवळीक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
- राज ठाकरेंची मुंबई बाहेरून वाढदिवस साजरा करण्याची घोषणा
राज ठाकरे यांनी ११ जून रोजीच आपल्या एक्स अकाऊंटवरुन आपण वाढदिवसाच्या दिवशी (१४ जून २०२५) मुंबईत नसणार असल्याचे सांगितले होते. ते सहकुटुंब मुंबईबाहेर जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. “मी वाढदिवस साजरा करणार नाहीय का? काही विशेष कारण आहे का? तर असं कोणतंच कारण नाहीय. याचे कोणतेही अर्थ काढू नका,” असे आवाहनही त्यांनी त्यावेळी केले होते.














Leave a Reply