पनवेल तालुक्यात मंगळवार दि. 6 जून रोजी तसेच बुधवार दि. 7 जून रोजी आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली. सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे अनेक विवाह समारंभांवर या पावसाचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी वऱ्हाड आणि पाहुण्यांना पावसामुळे त्रास सहन करावा लागला. काही मंडपांत पाणी साचल्यामुळे कार्यक्रम थांबवावे लागले. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांत मंडपाचे साहित्य उडून गेले. त्याचप्रमाणे पनवेल महापालिका हद्दीत तब्बल १६ झाडे उन्मळून पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या हळदी समारंभांमध्ये मुसळधार पावसाने खोडा घातला. अचानक आलेल्या पावसामुळे मंडपात पाणी साचून कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला. बुधवार दिनांक ७ जून रोजीही दुपारी जोरदार पावसामुळे परिस्थिती अशीच राहिली. पावसाच्या वेगामुळे काही इमारतींच्या पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. पनवेलमध्ये २, कळंबोलीमध्ये ३, कामोठेमध्ये ४, आणि खारघरमध्ये ७ झाडे उन्मळून पडली. तसेच ग्रामीण भागांमध्येही अनेक झाडे व वीज खांब कोसळल्याचे निदर्शनास आले आहे.
या अवकाळी पावसामुळे वीज पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला. अनेक भागांमध्ये वीज खंडित झाली होती. काही भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात देखील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर या पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. काही भागांत झाडे कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करत परिस्थिती नियंत्रणात आणली.







Leave a Reply