हिवताप / डेंग्यू आजारांबाबत पोलीसांमध्ये शिबीरांव्दारे जनजागृती

हिवताप / डेंग्यू आजारांबाबत पोलीसांमध्ये शिबीरांव्दारे जनजागृती

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष जनजागृती शिबीरांचे आयोजन करुन नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू  आजारांबाबत व डासउत्पत्ती स्थानांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे. 

      त्याचाच एक भाग म्हणून 19 जुलै रोजी नमुंमपा कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन तसेच वाहतुक नियंत्रण शाखा याठिकाणी विशेष शिबीरांचे आयोजन करुन  हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती करण्यात आली.

      नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 16 पोलीस स्टेशन व वाहतुक नियंत्रण शाखा यामध्ये शिबिरांचे आयोजन करुन एकूण  3809 पोलीस व तेथे भेट देणाऱ्या 400 हून अधिक नागरिकांमध्ये हिवताप / डेंग्यू आजाराविषयक जनजागृती करण्यात आली. तसेच 120 पोलीस व अभ्यागत नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले.

      सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यात ॲनॉफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखविण्यात आल्या. त्याचप्रमाणे घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करून ठेवावेत. त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ व कोरड्या करून ठेवणे, कुठेही पडलेले भंगार साहित्य, टायर्स इत्यादी नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू देवू नये या सूचनांच्या अनुषंगाने अनेक पोलीसांनी घरात व घराभोवतालच्या परिसरात या ठिकाणी डासोत्पत्ती होते याची माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले व महानगरपालिकेचे आभार मानले. ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबतही पोलीसांना व नागरिकांना प्रोत्साहित करुन जनजागृती करण्यात आली.

नमुंमपा आरोग्य विभाग आपल्या परीने जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यवाही करीत आहे, त्यासोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजूबाजूचा परिसर तसेच टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *