स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूरक गोष्टी असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ अंतर्गत स्वच्छ भारत मिशनमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानाच्या अनुषंगाने 30 जुलै ते 5 ऑगस्ट या आठवड्याभराच्या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार संयुक्त मोहीमा राबविण्यात येत आहेत.
या मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 30 जुलै रोजी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली तसेच सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण व मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंह चव्हाण व श्री.नरेश अंधेर यांच्या नियोजनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 26 नागरी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील विविध भागांमध्ये स्वच्छता व आरोग्य विशेष मोहीम राबविण्यात आली.

ही मोहीम आज संयुक्तपणे संभाजी नगर, करावेगांव, से-48 ए, गांधीनगर, नेरुळगांव, बांचोली मैदान ते शांघाई हॅाटेल, सारसोळे गांव, शिरवणेगांव, सानपाडा गांव, तुर्भेगांव, श्रमिकनगर खालची व वरची झोपडपट्टी, हनुमान नगर, जुहूगाव, पोलीस पाटील चाळ ते शाळा क्रमांक 27 ते आर के भगत बिल्डींग वाशीगांव, खैरणेगाव, महापेगांव, समर्थनगर, गांवदेवी वाडी, चिंचआळी पूर्ण, से-10ए, कातकरीपाडा, छत्रपती रहिवाशी संघ, यादवनगर, समतानगर, विष्णुनगर, नोसीलनाका, घणसोली गाव, कोपरखैरणेगांव या ठिकाणी राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये परिसरातील भंगार साहित्य हटविणे, परिसराची साफसफाई करणे, गटारे तुंबलेली असल्यास ती स्वच्छ करणे, छोट्या प्रमाणातील अभियांत्रिकी कामे करणे, डासअळीनाशक फवारणी करणे तसेच उंदीर / घुशी यांचा उपद्रव असलेल्या ठिकाणी औषध टाकून मुषक नियंत्रणाची कार्यवाही करणे अशा विविध प्रकारे कार्यवाही करण्यात आली. संबंधित भागाचे स्वच्छता अधिकारी , स्वच्छता निरीक्षक, आरोग्य सहाय्यक यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता दूत, हिवताप विभागातील डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी कर्मचारी तसेच मूषक नियंत्रण कर्मचारी यांनी ही मोहीम अथक काम करून यशस्वीपणे राबविली.

तरी या अनुषंगाने नवी मुंबईकर नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील व घराभोवतालचे भंगार साहित्य याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरुन आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी राहील असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.












Leave a Reply