नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (NMMT) ताफ्यात ५१ नवीन पर्यावरणपूरक सीएनजी बसेस दाखल झाल्या आहेत. घणसोली आगारात आयोजित एका विशेष सोहळ्यात वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. एनएमएमटीच्या ताफ्यात एकूण १५० नवीन बसेस दाखल होणार असून, पहिल्या टप्प्यात या ५१ बसेस सेवेत आल्या आहेत. उर्वरित बसेस आगामी महिनाभरात दाखल होणार आहेत.
या सोहळ्याला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, परिवहन सभापती विकास झंजाड, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, परिवहन व्यवस्थापक उमाकांत जंगले यांच्यासह परिवहन समितीचे सदस्य, महापालिकेचे नगरसेवक-नगरसेविका आणि परिवहनचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह उपस्थित सर्वच मान्यवरांनी नवीन सीएनजी बसमध्ये बसून प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव घेतला. यावेळी त्यांनी असा विश्वास व्यक्त केला कि , या नवीन बसेसमुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील फेऱ्यांची संख्या वाढणार असून प्रवाशांचा प्रतीक्षाकाळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच, या पर्यावरणपूरक बसेसमुळे शहरातील प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. याचवेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, येणाऱ्या काळात पर्यावरणपूरक वाहतुकीला अधिक चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसच्या समावेशावर विशेष भर दिला जाईल.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना परिवहन सभापती विकास झंझाड यांनी, मागील चार महिन्यांत परिवहन समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा आढावा घेतला. तसेच एनएमएमटी उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर ‘ॲक्शन प्लॅन’ची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते परिवहन समिती सभापती विकास झंझाड यांच्यासह सर्व समिती सदस्यांचा व परिवहनच्या अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला .
उद्घाटनप्रसंगी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले की, “नागरिकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि परवडणारी परिवहन सेवा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे मुख्य प्राधान्य आहे.त्यासाठी बस आगारांच्या व्यावसायिक वापरातून परिवहन सक्षम करण्यावर विविध प्रोजेक्ट्स आणले जातील. वाशी बस आगाराच्या धर्तीवर अन्य आगारांतील उपलब्ध जागेचा व्यावसायिक वापर करून तिथे व्यापारी संकुले, हॉटेल्स आणि अन्य नागरी सुविधा विकसित करण्याचा पालिकेचा मानस आहे.या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग परिवहन सेवा अधिक हायटेक करण्यासाठी आणि प्रवाशांना किफायतशीर दरात सेवा देण्यासाठी केला जाईल. तसेच, एनएमएमटीच्या उत्पन्न व खर्चाचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा लवकरच केल्या जातील.
यावेळी परिवहन समिती सभापती विकास झंझाड यांनी मीडियाशी संवाद साधताना , नवीन सीएनजी बसेस ताफ्यात दाखल झाल्यामुळे प्रवाश्याना याचा किती लाभ होईल यावर प्रकाश टाकला
महापालिकेचा प्रशासकीय कार्यकाळ संपून परिवहन समिती अस्तित्वात आल्यानंतर, सभापतीपदाची सूत्रे हाती घेताच प्रशासनाला गती देत कशा प्रकारे ‘धडाकेबाज’ निर्णय घेण्यात आले, यावर त्यांनी विशेष भर दिला.












Leave a Reply