पावसाळी कालावधीतील क्षेत्रीय स्तरावरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा फिल्डवर जाऊन घेताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शहाबाज बेलापूर व जुहूगाव वाशी या ठिकाणी घडलेल्या इमारत दुर्घटना स्थळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तेथील रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दिलासा देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

दि. ४ जुलै रोजी बेलापूर येथील शहाबाज गाव (सेक्टर-१९) मधील ‘अविघ्न सोसायटी’च्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि हतबल झालेल्या रहिवाशांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बाधित कुटुंबांची महानगरपालिकेच्या ‘वारकरी भवन’ निवारा केंद्रात व नातेवाईकांकडे सुरक्षित सोय करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून इमारत सीलबंद करून तिथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता, महानगरपालिकेमार्फत इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ तत्परतेने पूर्ण करून घेण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हे ऑडिट झाल्यानंतर रहिवाशांना त्यांचे आवश्यक सामान काढण्याची परवानगी दिली जाईल, असे सांगत महापौरांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या पाहणी दरम्यान उपायुक्त डॉ. अमोल पालवे, सहाय्यक आयुक्त प्रशांत नेरकर आणि इतर मनपा अधिकारी उपस्थित होते.
अशाचप्रकारे 05 जुलै रोजी सेक्टर-11 जुहूगाव,वाशी येथील गीता अपार्टमेंट या तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाहेरील स्लॅब ग्रीलसह रस्त्यावर कोसळून राजेश शेट्टी ह्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटना स्थळाला महापौर सुजाता पाटील यांनी भेट देत इमारतीचा सर्व पडिक भाग निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. प्रामुख्याने बाहेरील ग्रील त्वरित काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळीउपमहापौर दशरथ भगत , स्थानिक नगरसेविका अंजनी भोईर , वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे व कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चौडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
महापे एमआयडीसी येथील पोलीस चौकीसमोर रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचलेल्या ठिकाणाचीही पाहणी करत त्याठिकाणी सुरु असलेल्या जेसीबीने नाल्याचे पात्र मोठे करण्याच्या कामाला वेग दयावा असे महापौर सुजाता पाटील याणी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त भरत धांडे यांना निर्देश दिले. ठाणे बेलापूर रोडवरील स्थितीची दिघ्यापर्यंत पाहणी करत ग्रीनवर्ल्ड नाल्यातील प्रवाहाचीही महापौर सुजाता पाटील यांनी उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह पाहणी केली.


पाहणी दौऱ्यात तीन दिवसातील मुसळधार पावसात मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना सर्वत्र घडल्या असून पडलेली झाडे उचलून नेण्याचे काम जलद गतीने करावे असेही निर्देशित करण्यात आले.












Leave a Reply