नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पाणीपुरवठा व मलनिःसारण विभागाचे सभापती रविकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवी मुंबईकरांवर कोणताही नवीन पाणी कर न लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र,शहरात सध्या सुरू असलेले शटडाऊन आणि पाणीपुरवठ्यातील विस्कळीतपणाचा मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला . विशेष म्हणजे, नवी मुंबई शहरात सुरू असलेली पाणी कपात पाहता, नवी मुंबईच्या हक्काच्या ‘मोरबे धरणातून’ शहराच्या हद्दीबाहेर दिल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबतही सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शहरातील पाण्याची वाढती कमतरता पाहता, यासंदर्भात प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी बैठकीत सदस्यांनी लावून धरली.
सर्व प्रश्नांची गंभीर दखल घेत सभापती रविकांत पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले कि , पाणीपुरवठा विभागाने सर्व मुद्द्यांची तातडीने नोंद घ्यावी आणि यावर तात्काळ ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, जेणेकरून बिघडलेले पाण्याचे नियोजन पुन्हा रुळावर येईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल,
बैठकीनंतर मीडियाशी बोलताना रविकांत पाटील यांनी सांगितले कि ,या बैठकीत चालू वर्षात पाणी करात कोणतीही वाढ न करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत सभापती रविकांत पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले कि ,शहरातील पाणी कपात आणि पाणीपुरवठ्याचे प्रशासनाने योग्य नियोजन करून तातडीने निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही.
यावेळी त्यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. तसेच शहरात गेल्या काही दिवसांत आलेल्या दूषित पाण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने सतर्क राहून आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.












Leave a Reply