नवी मुंबईत घडलेल्या लागोपाठच्या दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनांनी संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. अशा अत्यंत कठीण आणि अंधारमय प्रसंगात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनसेवेच्या शिकवणीनुसार, नवी मुंबई शिवसनेच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर पीडित कुटुंबांसाठी ‘माणुसकीचा खंबीर आधार’ बनून पुढे आले. नेरूळ येथे विजेचा धक्का लागलेल्या घटनेतील शुभांगी बलखंडे व उज्ज्वला वाघ या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून देवदूतासारखा धावणाऱ्या रिक्षाचालक प्रवीण महाले याला १ लाख रुपयांची मदत देऊन त्यांनी माणुसकीचा सन्मान केला.
या दुःखासोबतच, ऐरोलीच्या मनपा रुग्णालयातील सोनम डोंगरे व त्यांच्या बाळाच्या वेदनादायी मृत्यूच्या घटनेने मन हेलावले असताना, या प्रकरणातील उपचार घेत असलेल्या दुसऱ्या गर्भवती महिला रिचा मिश्रा यांना तातडीने १ लाख रुपयांची तर सव्वा वर्षांपूर्वी महापालिका रुग्णालयात मृत पावलेल्या संगीता खरात यांच्या पोरक्या चिमुरडीच्या शिक्षणासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.संकटकाळात केवळ धीराचे शब्द न देता, पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत किशोर पाटकर यांनी संवेदनशीलतेची जपणूक करत संपूर्ण कुटुंबाला खऱ्या अर्थाने माणुसकीचा भक्कम आधार दिला.












Leave a Reply