देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहराचे मानांकन असून या नावलौकिकात आपल्या स्वच्छताकर्मींचा सर्वात महत्वाचा वाटा असून त्यामध्ये कचरा वेचक महिलांचेही मोठे योगदान असल्याचे सांगत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी संघर्षातून खंबीरपणे उभ्या राहणा-या महिलांचे कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित भारत सरकारच्या ‘नमस्ते (नॅशनल ॲक्शन फॉर मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम)’ योजनेंतर्गत नमुंमपा क्षेत्रातील अनपौचारिक कचरा वेचक (इन्फॉर्मल वेस्ट पिकर्स ) यांना पीपीई कीट, आयुष्मान भारत कार्ड आणि नमस्ते ओळखपत्र वितरण समारंभप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख प्रा.वृषाली मगदूम, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजूसिंग चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्त्री ही संघर्षातून अधिक ठामपणे उभी राहते हे कोरोना काळात प्रकर्षाने दिसून आले असून घर, संसार सांभाळून शहर स्वच्छतेसाठी दररोज आपले योगदान देणा-या व त्यातही दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या भगिनींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे सांगत महापौर महोदयांनी शिक्षणासाठी वय नसते हे दाखवून देत तुम्ही इतरांना आदर्श वाटेल असे काम केले असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी झटणा-या सुंदर हातांचा सन्मान करीत असल्याचा आनंद महापौरांनी व्यक्त केला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांनी ‘नमस्ते’ योजनेंतर्गत अनपौचारिक कचरावेचकांची सुरक्षितता, आरोग्य व सन्मान याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगितले. यादृष्टीने कचरा वेचकांचे प्रोफाईलींग हे परिसर सखी विकास संस्थेच्या वतीने करण्यात येत असून आत्तापर्यंत 930 महिलांची नोंदणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी नमस्ते योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या 448 पीपीई किट्सचे वितरण आज करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच ई रिक्षा कचरा संकलन वाहन चालक महिला व दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कचरा वेचक महिलांचा सन्मानही आज होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख प्रा.वृषाली मगदूम यांनी कचरावेचक महिलांकरिता करण्यात येत असलेल्या कामात अगदी सुरूवातीपासूनच नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. 5 झोपडपट्ट्यांमध्ये राबविण्यात येणारे ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ हे देशभरातील आगळावेगळा उपक्रम म्हणून नावाजला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नमस्ते योजनेमध्ये कचरावेचक महिलांचा समावेश करण्यासाठी सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याविषयी माहिती देताना त्याला यश लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
परिसर सखी विकास संस्थेच्या प्रमुख श्रीम. रूक्मिणी पॉल यांनी स्वअनुभव कथन करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडून कचरा वेचक महिलांना जो सन्मान मिळतो त्यामुळे खूप आनंद वाटतो असे सांगितले.
याप्रसंगी श्रीम.नंदा घुले, श्रीम.आशामती शेंडगे, श्रीम. शशिकला कसबे, श्रीम.चंद्रकला जाधव, श्रीम.सावित्री सगणे, श्रीम.शोभा पालराज, श्रीम.लैलाबी शेख, श्रीम.लक्ष्मी कांबळे, श्रीम.दुर्गा गोहील, श्रीम.कौसाबाई चंदवाडे, श्रीम.शकुंतला घनघाव, श्रीम.स्वाती थडके, श्रीम.अनिता थोरात, श्रीम.मीरा जाधव, श्रीम.हनिफा शेख यांना प्रातिनिधिक स्वरूपात नमस्ते योजनेंतर्गत पीपीई किट व सामुग्री प्रदान करण्यात आली.
त्याचप्रमाणे यूएनडीपी योजनेंतर्गत प्राप्त दिघा, रबाळे, ऐरोली, घणसोली भागात चालणा-या ई रिक्षा कचरा संकलन वाहन चालक श्रीम.रूक्मिणी पॉल, श्रीम.कविता कुडवे, श्रीम.राधा गुप्ता, श्रीम.सुनिता सुरवाडे, श्रीम.निकिता सोमवंशी, श्रीम.प्रतिक्षा कुडवे, श्रीम.सुनिता वाकळे, सुवर्णा कलाम व श्रीम.आनंदी कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला.
‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन स्त्री मुक्ती संघटना आणि प्रभात ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 11 कचरा वेचक महिला यावर्षी दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या यशस्वी महिलांनाही महापौर महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या आरंभीच्या सत्रात उपस्थित कचरावेचक महिलांनी चळवळीतील समुहगीते, प्रेरणादायी गीते व मनोगते सादर करून आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडविले
शहर सुंदर ठेवणा-या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी – महापौर श्रीम.सुजाता पाटील
















Leave a Reply