नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी सुजाता सुरज पाटील यांची निवड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या महापौर पदासाठी भाजपकडून नेरुळ प्रभाग क्र. २३ येथील नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सक्षम, अनुभवी आणि विश्वासार्ह महिला नेतृत्वाची निवड करत पक्षाने दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सुजाता पाटील या सुशिक्षित, संयमी आणि सौम्य नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी नगरसेविका म्हणून कार्यरत असताना त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदावर उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी करत प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. महिला, बालकल्याण तसेच नागरी प्रश्नांबाबत त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ओळखला जातो.

महापौरपदाची जबाबदारी स्वीकारताना पक्षनेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नागरिकाभिमुख आणि विकासकेंद्री धोरणांवर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *