20 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला,नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी

केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या पाण्यापैकी 5 टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही या बैठकीत अनुकूल निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली,

नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून महाराष्ट्राला केवळ वीज मिळाली, मात्र राज्याच्या वाट्याचे 10 टीएमसी पाणी मिळाले नव्हते. त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यासाठी देय असलेल्या निधीसह इतरही अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय झाले. महाराष्ट्राला आता केवळ ₹27 कोटी देय असून उर्वरित देय रक्कम रद्द झालेली आहे. महाराष्ट्राच्या हिश्श्याच्या 10 टीएमसी पाण्यापैकी नर्मदा-तापी डायव्हर्जन या स्कीममधून 5 टीएमसी आणि उकाई प्रकल्पातून 5 टीएमसी पाण्याची मागणी महाराष्ट्राने केली होती, त्याही संदर्भात आजच्या बैठकीत अनुकूल निर्णय झाला. पावसाच्या कालावधीत म्हणजे उकाई धरणात पाणी असतानाच्या काळात हे पाणी उचलण्यास गुजरातने अनुकूलता दर्शवली. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी त्याला मान्यता दिली आहे, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे आभार मानले. उकाई धरणातून पाणी उचलण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून सुव्यवस्थित आराखडा तयार करण्यात येत असून या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राला सर्वाधिक निधी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारने पीएम कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक म्हणजेच एकूण निधीपैकी 51% निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे आभार मानले. सुधारित पीएम कुसुम योजनेतही महाराष्ट्राला अधिकाधिक सहकार्य मिळावे, अशी विनंती करण्यात आली असून, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्राने अधिक मोठे उद्दिष्ट निश्चित करून ते पूर्ण करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असून, भविष्यातही केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक निधी व सहकार्य मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *